मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०१६

परी मी त्यासी न म्हणे संत

करिशी ते देवा करि माझे सूखे । परी मी त्यासी न म्हणे संत ॥१॥
जया राज्य द्रव्य करणे उपार्जना । वश दंभ माना इच्छे झाले || २॥
जग देव परी निवडीन निराळे । ज्ञानाचे आंधळे भार वाही ।।३।।
तुका म्हणे भय न धरी मानसी । ऐशियाचे विशी करिता दंड ।।४।।
परमार्थ मार्ग म्हणावा तसा सोपा नाही . आज सकाळपासून विविध घडामोडी घडत आहेत . त्यात काही परमार्थातील आहेत काही राजकारणातील आहेत . एकमेकांची अब्रू चोहट्यावर आणण्यात धन्यता मानतात . " मतामतांचा गलबला । कोणीच ऐकेना कोणाला । थोर म्हणताच । वाया गेला ।।" हे एक संत वाचन आहे . संत नव्हती जागा माणसाच्या सारिखे ।। संत हे सांसारिक माणसासारखे नसतात. त्यांना कुठलीही उपाधी आवडत नाही . उपाधिरहित जीवन हे खरे संत जीवन असते . " मांडीना स्वतंत्र फड । अंगी अहंता येईन वाड ।।" हे नाथरायांनी चिरंजीवपदात सांगून ठेवले आहे पण ! कोण ऐकतो ? गड, फड , या उपाधीने महाराज शोभत नाही तर तो स्वरुपस्थितीने शोभत असतो . राजकारण आणि परमार्थ या दोन वेगळ्या बाजू आहेत . त्याची सरमिसळ होता कामा नये .
एकदा जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांना एकाने संत कसे असतात असे विचारले ? तेव्हा त्याचे उत्तर त्यांनी दिले ते म्हणतात " हे देवा ! माझे काय व्हायचे ते होवो पण ! अशा व्यक्तीला संत म्हणणार नाही , ज्याला राजकारण करून परमार्थ करायचा , द्रव्य मिळवायचे,व आपले पोट भरायचे , ज्याच्या मनामध्ये दंभ आहे , दंभ म्हणजे असतो एक आणि दाखवतो दुसरेच , आणि इच्छेचे अधीन ज्याचे जीणे झाले आहे . अशा व्यक्तीला मी संत म्हणणार नाही . वास्तविक जगत ब्रहम आहे , देव आहे तरीही मी निवडनिवड करिन ज्यांना आत्मज्ञान नाही केवळ राजकारण करून आपले संतपण, महंतपण टिकवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न जो करतो तो ज्ञानदृष्टी नसलेला आंधळा आहे असा व्यक्ती नुसता भारवाही हमाल आहे. त्याचे संतजीवन , महंतपण व्यर्थ आहे. जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या काळी सुद्धा असे काही महंत होतेही त्यांचा महाराजांनी तीव्र शबदात निषेध केलेला आहे. " भिक्षा पात्र अवलंबिणे । जळो जीणे लाजिरवाणे ।।" कष्ट न करता , ज्ञान नसताना भिक्षा मागणे हे लाजिरवाणे जीणे आहे . " हरिभजनें हे ढवळीले जग । चुकविला लाग कळिकाळाचा ।।" हे साधूचे काम आहे . आता कुठेही पाहावे तर साधू ,महंतांच्या मारामाऱ्या , कुंभमेळ्यात तर तलवारीने मारामाऱ्या होतात हे ऐकणाऱ्याला लाज वाटते महंतपद, मंडलेश्वर , महामंडलेश्वर या पदव्या मिळवण्यासाठी लाखो रुपये द्यावे लागतात हे वास्तव आहे . जगद्गुरू श्री तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात कि " न होती ते संत करिता कवित्व । संतांचे ते आप्त नव्हती संत ।।१।। येथे नाही वेष सरते आडनाव ।निवाडे घावडावं व्हावा अंगी ।।२।। नव्हती ते संत धरीता भोपळा करिता वाकला प्रावरण ।।३।। नव्हती ते संत करिता कीर्तन । सांगता पुराणे नव्हती संत ।।४।। नव्हती ते संत वेदाच्या पठणे ।कर्म आचरणे नव्हती संत ।।५।। नव्हती संत करिता तप तीर्थाटणें । सेविल्या वन नव्हती संत ।।६।। नव्हती संत माळा मुद्रांच्या भूषणे । भस्म उधळणे नव्हती संत ।।७।। तुका म्हणे नाही निरसीला देह । तोवरी अवघे हे सांसारिक ।।८।। तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा जर विचार केला तर मला वाटत नाही एखादा तरी खरा संत सापडेल कि नाही ? आणि अशा दांभिक संतांविषयी महाराज म्हणतात कि अशा माणसाला दंड करण्यात मला बिलकुल भीती वाटत नाही . किंवा ज्याला दंड करण्याचा अधिकार आहे त्याने तरी भय भरू नये .

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०१६

खंडित शून्यवाद

जय हरी !  
अभावातून भावाची कधीही उत्पत्ती होत नसते व भावरूप पदार्थाचा कधीही अभाव होत नसतो . पण शून्यवादाची जे सहा नास्तिक तत्वज्ञान सांगणारे शास्त्रे आहेत ते म्हणतात कि " हे जग शून्यातून निर्माण झाले ". हे शून्यवादी अभाव प्रमाण मानतात पण विचार करा नसण्यातून असणे कधीच निर्माण होत नाही . शून्य म्हणजे अभाव . जगद्गुरू श्री तुकाराम महाराज म्हणतात " न झाला प्रपंच आहे परब्रहम ।अहं सोहम ब्रह्म आकळले ।।" कोणतेही मिथ्या पदार्थाला अधिष्ठान सत्य लागत असते . सत्य अधिष्ठानाशिवाय मिथ्या पदार्थ भासत नाही . शून्यवादी मात्र म्हणतो कि काहीहि जे नाही तेच जग निर्माण करते . किती हास्यास्पद आहे . " वांझेचीया पुत्रा कैची जन्म पत्रिका ।।" वांझेच्या मुलाला जन्मपत्रिका कशी असू शकेल ? तसे जग अधिष्ठानाशिवाय कसे दिसेल किंवा भासेल ? " रज्जू सर्पाकार। भासियेले जगदंबर ।।" असे तुकाराम महाराज म्हणतात. ( विवर्तवाद ) एके हाती दंतु । जो स्वभावाता खंडितु ।।... ज्ञा . तात्पर्य शून्यवाद हा स्वभावात:च खंडित आहे . एक सुंदर दृष्टांत आहे ... एक भिकारी एका घराच्या बाहेर उभा राहून भिक्षेकरिता हाक मारतो व म्हणतो " माई भिक्षा वाढा " आतील बाई म्हणते कि " पुढे जा पुढे ! घरात कोणी नाही . ! शून्यवादाची अशी स्थिती आहे कोणी नाही म्हणणारा कोणी तरी आहे ना ? म्हणजे नाही म्हणायचे त्याकरिता सुद्धा कोणीतरी अगोदर असावे लागते . आणि खरोखर कोणीच नसते तर कोणीच उत्तर दिले नसते . आणि म्हणे शून्यातून जग निर्मण झाले . कधी कधी एखादा माणूस म्हणतो सुद्धा " अहो ! माझ्या बापाने काहीहि केले नाही मीच सर्व शून्यातून निर्माण केले ." यालाच वदतो व्याघात दोष म्हणतात. "नासते विद्यते भावो नाभावो विद्यते संत:।। " वेदांत जग नाही असे म्हणत नाही तो म्हणतो जग आहे पण कसे " रज्जू सर्पवत " ते हि तुम्ही म्हणता म्हणून अगदी सोप सांगायचे तर व्यवहारात सुद्धा लोक म्हणतात "दिसत तस नसत म्हणून जग फसत " स्वप्नातील पदार्थ स्वप्न काली दिसतात पण जागे झाले कि ते मिथ्या ठरतात . स्वप्नातील पदार्थ हे अनिर्वाचिनीय व अतींद्रिय आहेत तरी पण ते भासतात . व जागे झाल्यावर त्याचे अस्तित्व संपते . तद्वत ब्रह्मज्ञान झाले कि जगद्भ्रास मिथ्या ठरतो .म्हणून अभाव प्रमा मानणारा शून्यवाद सहजच खंडित होतो .

शनिवार, १० सप्टेंबर, २०१६

।। परपीडे चित्त दुखी: होते ।।






जय हरी !

नवल र्तले! लाखा लाखाचे मोर्चे निघतात त्यामध्ये लोक शांतपणे चालतात कुठली घोषणा नाही, आरडा ओरडा नाही, "मूकपणे केलेला आक्रोश " सरकारला ऐकू गेला पाहिजे हि त्यांची धारणा आहे  . आत्मक्लेश करून घेणे हा आंदोलनाचा फार चांगला मार्ग आहे  . जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या वह्या इंद्रायणीत बुडविल्या तेव्हा महाराजांना किती क्लेश झाले , किती वेदना झाल्या ! पण त्यांनी प्रस्थापितांना दोष देत बसले नाही उलट १३ दिवस उपोषण केले व स्वतःला आत्मक्लेश करून घेतले आणि फलस्वरूप गाथा इंद्रायणीत व लोकगंगेत तरला . तसेच ह्या मोर्च्याचे कौतुक वाटते . कुठेही जाळपोळ नाही, फूटतूट नाही, उलट मोर्चा पुढे गेल्यावर स्वयंसेवक पाठीमागे स्वच्छता करतात . "मौनं सर्वार्थ साधनं ।।"हे सुभाषितकारांनी म्हटले ते किती सार्थ आहे . नेहमी बोलणार्यापेक्षा कधीही न बोलणारा जर बोलला तर तो मार्मिक बोलत असतो आणि अर्थपूर्ण बोलत असतो व त्याच्या बोलण्याचा परिणाम होत असतो. सतत बोलणार्यांची स्थिती उत्तरासारखी होते " बालिश बहू बायकांत बडबडला ।।" त्याची बडबड व्यर्थ ठरण्याची  शक्यता असते . कोणी नेता नाही ,  पुढारी नाही,इथे समाज मनच पेटून उठले आहे . अशीच एकी आणि संघटन जर मराठ्यांनी ठेवले तर ध्येय सध्या होणे अवघड नाही . जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी म्हटले आहे " यारे यारे लहान थोर । याती भलते नरी नर । करावा विचार । न लगे चिंता कोणासी ।।"  याप्रमाणे सर्वांना बरोबर घेऊन एक चांगला समाज  घडविण्याचे श्रेय मिळाल्याशिवाय राहणार नाही .

शुक्रवार, २ सप्टेंबर, २०१६

आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव





आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव । दैवताचे नाव सिद्धेश्वर ।।१।।
चौर्यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा । तो सुख सोहळा काय वर्णु ।।२।।

आळंदी हे तर अनादी काळापासूनचे सिध्दांचे क्षेत्र आहे , तेथे ब्रहमदेवापासून ते इंद्रापर्यंत  अनेकांनी यज्ञ याग करून हि भूमी पावन केली आहे. व माउलींनी येथे वास्तव्य केल्यापासून या तीर्थ क्षेत्राची तर महती फार वाढली व भागवत धर्म मंदिराचा पाया ज्ञानोबांनी रचला आणि वारकरी संप्रदायाला एक मोठे व्यासपीठ व अधिष्ठान मिळाले . या क्षेत्राची वाढ व महिती श्री नाथ बाबांनी व श्री जगद्गुरू तुकाराम महाराजांनी केले . तुकाराम महाराजांनी तर स्वखर्चाने जणिर्णोद्धार केला . तुकाराम महाराजांचे चिरंजीव श्री नारायणबाबांनी तर ज्ञानोबा -तुकोबांच्या पादुका एकाच रथात ठेऊन आळंदी ते पांढरी असा आषाढीचा सोहळा सुरु केला पुढे तो वेगवेगळा झाला . व पुढे हैबत बाबांनी तर माउलींच्या पादुका गळ्यात घेऊन पंढरीला गेले . तात्पर्य या क्षेत्राची माहिती दिवसेंदिवस वाढतच जातेय . या क्षेत्राने महाराष्ट्राला हजारो कीर्तनकार दिले आहेत.
            तीर्थक्षेत्राचे काही नियम असतात , तिथे जी नदी असते त्या नदीमध्ये साबण लावून  अंघोळ करायची नसते, नग्न होऊन स्नान करायचे नसते . त्या नदीमध्ये लघुशंका करायची नसते. साबण लावून कपडे धुवायचे नसतात . कारण भाविक लोक ते पाणी तीर्थ म्हणून प्राशन करीत असतात. हे तिथले पावित्र्य सांभाळले गेलेच पाहिजे व तशी व्यवस्था तेथे कार्यरत असावयास हवी . परवा मी आळंदीला माऊलीच्या दर्शनाला गेलो होतो तेव्हा इंद्रायणीवर तीर्थ घेण्यासाठी गेलो आणि बघितले तर घाटावर जिकडे तिकडे कचरा पडलेला व घाणीचे साम्राज्य पसरलेले, व अशाही ठिकाणी मात्र घाटाच्या कामासाठी व इतर व्यवस्थेसाठी नगरपालिकेचा/ संस्थानचा  पावती फाडण्याचा टेबल लावलेला .आणखी थोडे पुढे गेलो तेव्हा निदर्शनास आले कि जिथे तीर्थ घ्यायचे तिथे काही महिला खुशाल कपडे साबण लावून धूत होत्या आणि हाच प्रकार सर्वत्र होता . तीर्थ कसे घ्यावे हा एक प्रश्न पडला तिथे नगरपालिकेचा कोणीही सेक्युरिटी नव्हता कि कोणी स्वयंसेवकही नव्हता . लोक भावनेने नदीत  उतरत होते पाय धुवून बाहेर येत होते पण ! तीर्थ घेत नव्हते . पण या स्थानिक लोकांना कोण काय म्हणणार ? त्यांचे प्रबोधन कसे करणार ? भारतात सर्व तीर्थात यापेक्षा वेगळी स्थिती नाही . मा . प्रधानमंत्री श्री मोदी साहेबांनी स्वच्छतेचा नारा दिलेला आहे . पण हे काम एकट्याचे नाही . मी ऑस्ट्रेलियात गेलो होतो तेथील स्वच्छता कमालीची आहे . यारा नावाची नदी आहे तेथे आम्ही गेलो तेव्हा आम्ही बघितले कि नदीच्या किनाऱ्यावर कुठेही कचरा घाण दिसली नाही . त्या लोकांना ते जमते पण आपण का नाही असा विचार करत ? मानसिकताच खराब झाली आहे. अर्थात हे सर्व स्थानिक लोकच करतात असे नाही तिथे जाणारे यात्रेकरू सुद्धा घाण करतात . तर मित्रांनो आपण सुरवात आपल्यापासूनच करूयात कुठेही रस्त्यावर , घाटावर, पवित्र ठिकाणी आपण कोणत्याही स्वरूपाची घाण करायची नाही . नेहमी आपल्याबरोबर एका पिशवीत कागदी पिशव्या ठेवायच्या आणि आपल्याकडचे जे काही टाकाऊ असेल ते त्या पिशवीत टाकायचे व जिथे डस्ट बिन असेल तेथे ते टाकून द्यायचे . रामकृष्ण हरी !!

भगवंताचार्य अशोकानंद महाराज कर्डीले
              

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०१६

|| कामातुराणां भयं ना लज्जा ||

           


                  
                भारतीय तत्वज्ञानात चार पुरुषार्थ कल्पिलेले आहेत , धर्म , अर्थ , काम आणि मोक्ष . यातील दोन पुरुषार्थ म्हणजे अर्थ आणि काम जरी साधले गेले नाही तरी चालते परंतु धर्म आणि मोक्ष मात्र संपादन केलेच पाहिजेत . तसेच अर्थ आणि काम हे पुरुषार्थ तेव्हाच पुरुशर्थ ठरतात जेव्हा त्यांना " धर्माची " चौकट असते " वेचोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी ।।" या तुकोबाच्या म्हणण्याप्रमाणे जर धन कमावले तर तो पुरुषार्थ ठरतो पण जर   म्हणजेच भ्रष्टाचाराने पैसा कमावला कि तो पुरुषापरध ठरतो . तसेच काम या पुरुषार्थाचे सुद्धा आहे " धर्माविरुद्ध भुतेषु कामोस्मि भारतषर्भ ।।" धर्मानुकूल काम हा पुरुषार्थ असतो . धर्माने विहित , निषिद्ध , काम्य, प्रायश्चित , कर्म अकर्म, विकर्म असे वेगवेगळे कर्माचे प्रकार सांगितले आहेत नित्य , नैमित्तिक कर्मे केलीच पाहिजेत व निषिद्ध कर्मे करूच नयेत व झालीच तर त्यासाठी वेगवेगळे प्रायश्चित कर्मे आहेत . असो काम म्हणजे इच्छा त्यातही सदिच्छा वेगळी आणि असदिच्छा वेगळी . समाजाची घडी नीट चालावी यासाठी धर्माने हे नियोजन केले आहे. पण आपल्यला माहित आहे कि कितीही चांगले नियोजन करा त्यात अम्मलबजावणी नीट होईल असे नाही . त्यात दोष राहतो आणि त्याचे परिणाम वाईट होतात .
                  चांगली प्रजा उत्पन्न व्हावी म्हणून धर्माने काम या विषयाला पुरुषार्थ ठरवले आणि त्याचे योग्य नियमन व नियोजन केले तर चांगली प्रजा उत्पन्न होते याचे अनेक उदाहरणे आहेत. व कामाचे योग्य नियोजन न झाल्यामुळे भल्या भल्या व्यक्तींनी अत्याचार केल्याचे उदाहरणे आहेत . इतिहास पुराणातील उदाहरणे दिली कि हे म्हणतात पुराणातील वांगे पुराणात पण मित्रांनो तसे नाही ती एक प्रवृत्ती  आहे तिला काळाचे बंधन नाही . रावणासारख्याला काही कमी  नव्हते पण त्याने सुद्धा " हेमा " नावाच्या अप्सरेवर बलात्कार केला होता . तो पंडित होता ज्ञानी होता तरीही वासनेवर नियंत्रण मिळवू शकला नाही . इंद्राने वासनेपोटीच अहल्येशी समागम केला आणि शाप पदरात पडला . " महाराजांचा एक अभंग आहे "वासनेच्या सांगे नको जाऊ मना ।पहा त्या रावणा काय झाले ।।१।।।इंद्रा पडले भाग चंद्र झाला काळा । नारद चुकला चाळा भजनाचा ।।२।। " किंवा नाथ बाबा सांगतात कि " एडका मदन , केवळ पंचानन । धडक मारली शंकरा । केला ब्रह्मयाचा मातेरा ।।इंद्र चंद्रासी लाविला दरारा जेणे ।। तो जाण  केवळ पंचानन ।।" हि सगळी मोठ्यांची यादी आहे ज्यांना विधी निषेधाचे ज्ञान आहे अशांना वासना ताब्यात ठेवता अली नाही . अगदी ब्रहादेव तर स्वात:च्या मुलीच्या मागे वासनेने धावत होता . " ब्रम्हा डोलसते वेदार्थ ना कळे । तेथे हे आंधळे व्यर्थ होती ।। वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष । वेडे नाही ऐसे सांगितले ।।" पण इकडे बघितले तर संत मंडळी मात्र सद्विचाराने " काम " या विषयावर मात  करू शकली . " जाई वो माते न करी सायास । आम्ही विष्णुदास तैसे नोहो ।। तुका म्हणे तुज जरी पाहिजे भ्रतार । तरी का इतर लोक थोडे ।।" याचा परिणाम असा झाला कि ज्या वाईट विचाराने ती श्त्री अली होती तीच बदलली आणि त्यांची अनुयायी झाली . म्हणून नियंत्रित काम हा पुरुषर्थ आहे आणि अनियंत्रित काम हा विनाशाला कारणीभूत होतो .
                      अनियंत्रित काम वासनेतूनच बलात्कार, अत्याचार असे  घडत असतात . अशा या वासनांध लोकांवर नियंत्रण  दोन प्रकारे ठेवले जाते १) संस्कारद्वारे २) कायद्याद्वारे ... रांझ्याच्या पाटलाने एका तरुण स्त्रीवर अत्याचार केला असता छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा" चौरंग " केला म्हणजे हात पाय तोडून गाढवावरून धिंड काढली मग लोकांना कळले कि असे काही केले कि असे होऊ शकते . कामातुराणां भयं न लज्जा  वासनांध माणसाला भय वाटत नाही आणि लाजहि वाटत नाही . कायद्याचे भय नाही आणि नीतीची चाड नाही  . आता लोकशाही आहे अशा जबर शिक्षा होत नाहीत किंबहुना असे म्हटले जाते कि १०० गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका  निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता कामा नये . असे जर असेल तर गुन्हेगार कोर्टातून सुटून जातात हा आपला अनुभव आहे . तुकाराम महाराज सुद्धा एके ठिकाणी म्हणतात " काय करू देवा सत्ता नाही हाती । दंडुनी पुढती लावू वाटे ।" हे देवा सत्ता हातात नाही , नाही तर असे अन्यायी अत्याचारी लोकांना मीच दंड केला असता . सत्ता परिवर्तन घडवते म्हणतात पण सत्ता ज्याच्या हातात आहे त्याची मानसिकता हवी . आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल मी का लिहतोय " कोपर्डीची " घटना सर्वांना ज्ञात आहे , दिल्लीत जेव्हा निर्भयाकांड झाले तेव्हा साऱ्या जगाने  दखल घेतली सो कॉल्ड सोफिस्टिकेटेड लोक तर मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरले होते .... ते योग्यच होते यात वाद नाही पण कोपर्डीची घटना त्याहून भयानक होती पण ! या घटनेला जातीय रंग देऊन दोन समाजात तेढ उत्त्पन्न झाली . आता हे दुष्टचक्र किती दिवस चालणार आहे . जाती जातीमध्ये सलोखा निर्माण होऊ शकत नाही का ? या सर्व गोष्टीला राजकारण कारणीभूत आहे . प्रत्येकजण जण तापलेल्या तव्यावर आपली पोळी भाजून घेत असतो , फोटो छापून आणीत असतो . " तुका म्हणे ऐश्या नरा । मोजनि माराव्या पैजांरा ।।" किंवा तुका म्हणे याच्या थुंका तोंडावरी । जातो यमपुरी भोगाव्या ।।" हा महाराजांचा सात्विक संताप आहे . दुर्दैव असे आहे कि आता जेलमध्येही या अशा लोकांची मोठी बडदास्त ठेवली जाते , तिथेहि हे गुन्हेगार त्याच तोऱ्यात वागत असतात. गुन्हा करणाऱ्याला भीतीच राहिली नाही . " सांगितले तरी नायकीती बटकीचे । पुढे शिंदळीचे रडतील ।।" असा शाप सुद्धा महाराजांनी दिलेला आहे. संस्काराने माणूस घडत असतो . धर्म माना  नका मनू हा भाग वेगळा पण परस्त्री मातेसमान मानायला काय हरकत आहे . "Brothers and sisters god is one "  हा संदेश स्वामी विवेकानंदानी अमेरिकन लोकांना शिकागो येथे दिला तेव्हा बंधू - भगिनी हा भाव त्यांना नवीन होता कारण त्यांना फक्त " Ladies and gentleman " एवढेच माहित होते.  दृष्टी बदलली कि जग सुंदर आहे आणि दृष्टी विकृत झाली कि जग हे नरक आहे . कीर्तनकार, प्रवचनकार, समाजसुधारक, नेते, पुढारी  हे सगळे उदबोधनात्मक बोलत असतात पण ! याचा परिणाम होत नाही . का ? त्याचे कारण म्हणजे " बोलते मगर करते नाही मुहसे भले लबाड ". वृत्तीसह कृती नाही " सर्वच कमर्शियल झाले आहेत त्यामुळे समाजाचा सुद्धा यांच्यावर विश्वास राहिला नाही . अध्यतमाच्या क्षेत्रात करोडो रुपयांची उलाढाल होत असते . पण सत्कारणी किती लागते हे ज्याचे  त्यालाच माहित . "सब पैसेके भाई आपणा कोई नाही " दहशतवाद्यास शाहिद म्हणण्याची प्रथा आपल्याकडे रुजवली जातेय . नथुराम गोडसेचे उद्दात्तीकरण केले जातंय हि कसली मानसिकता . स्वतंत्र्य लढ्यातील एक मोठा नेता बलात्कारी होता पण त्याचेही उदात्तीकरण झाले ...... एक खोटे दहा वेळा सांगितले कि ते खरे वाटू लागते . असो तरीसुद्धा लोकशाहीने आपणास विचार स्वतंत्र्य दिलेले आहे त्याचा उपयोग करून आपण आपल्या परीने आवाज उठवू अर्थात एवढया मोठ्या भाऊगर्दीत आपला आवाज विरून सुद्धा जाईल पण आपण प्रयत्न सोडायचे  नाही . " सदैव सैनिका पुढेही जायचे , न मागुती तुवा कधी फिरायचे ".

 भागवताचार्य  अशोकानंद महाराज कर्डीले 

सोमवार, ११ जुलै, २०१६

अभंग गीता (मंत्र गीता ) -जगद्गुरू श्री तुकाराम महाराज

जय हरी ।

जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचा अभंग गाथा एव्हढेच वाङ्मय आपल्याला माहीत आहे पण !तुकाराम महाराजांचे आणखीही काही साहित्य आहे जे की काळाच्या ओघात लुप्तप्राय झाल्यासारखे आहे . जरासे माउलींनी भगवत  गीतेवर भाष्य लिहले , नाव ज्ञानेश्वरी अगदी त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांनी सुद्धा "मंत्र गीता " किंवा अभंग गीता नावाचा ग्रंथ लिहला आहे भगवत गीतेच्या श्लोकावर अभंगरूपात महाराजांनी भाष्य लिहले आहे . हाच ग्रंथ तुकाराम महाराजांची अनुग्रहित शिष्या  संत बहिणाबाई पाठक यांनाही हाच ग्रंथ दिला होता . . स्वतः: बहिणाबाईंनी त्यांना तुकाराम महाराजांनो कसा अनुग्रह दिला व मंत्र गीता दिली याविषयी अभंग लिहला आहे .
बहुत अंतरी शोक आरंभिला । का मज विठ्ठला मोकलिले ।।१।।
त्रिविध तापाने तापले मी बहु । जाईना का जीवु प्राण माझा ।।२।।
ताव अकस्मात सातव्या दिनी ।नामसंकीर्तनी घोषयुक्त ।।३।।
तुकाराम रूपे येवोनि प्रत्यक्ष । पूर्वपक्ष सांभाळिजे ।।४।।
नको करू चिंता मी तुजपाशीं ।घेई अमृताशी हातिचिया ।।५।।
गाय केले वत्स मुखी निघे धार । अमृत हे सार सेवी हेचि ।।६।।
ठेवोनिया कर मस्तकी बोलिला । मंत्र सांगितला कर्णरंध्री ।।७।।
म्या ही  पायावरी ठेविले मस्तक । दिधले पुस्तक "मंत्र गीता" ।।७।।
कार्तिक वद्य पंचमी रविवार । स्वामींचा विचार गुरुकृपा ।।८।।
आनंदले मन चिदरूपी कोंदले । उठोनि बैसले चमत्कारे ।।९।।
मंत्र पाठविती तुकोबास्वरूपा । स्वप्नामाजी कृपा पूर्ण केली ।।१०।।
अमृत पाजिले चवी अनारीसी । साक्ष ज्याची त्याची मनामाजी ।।११।।
बहिणी म्हणे ऐसी कृपा सद्गुरूची । तुकाराम साची पूर्ण केली ।।१२।।


तात्पर्य पूर्वी असे होते की ब्रह्मसूत्र, उपनिषदे, भगवतगीता या प्रस्थान त्रयीवर भाष्य केली त्यांना जगद्गुरू , आचार्य पद प्राप्त होत होते विषय तो नाही पण जसे माउलींनी गीतेवर ओवीरुपात भाष्य लिहले तसेच मराठीमध्ये  अभंग या छंदांमध्ये तुकाराम महाराजांनी " मंत्र गीता " नावाचे गीतेवर भाष्य लिहले आहे भगवत गीतेच्या प्रत्येक श्लोक महाराजांनी  अभंग लिहलेले आहेत . हे अभंग " गीतार्थ कोष " नावाचा एक ग्रंथ आहे त्यामध्ये आहे . हा ग्रंथ संग्राहक श्री दिनकर विनायक भिडे यांनी संपादित केला आहे . वंदे मातरम फाऊंडेशन , मुंबई यांनी तो प्रकाशित केला आहे . परंतु जसा गाथा प्रसिद्ध झाला तशी ही मंत्र गीता प्रसिद्ध का होऊ शकली नाही ? किंवा वारकरी संप्रदायात या मात्र गीतेचा प्रचार का होऊ शकला नाही ? का जाणीवपूर्वक हा ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचूच द्यायचा नाही की काय ?  हे मला सतत आश्चर्य वाटत आलेले आहे . बरे ही मंत्र( अभंग)  गीता माझ्या पाहण्यात पण आहे . वारकरी संप्रदायातील अनेकांना हा ग्रंथ माहीतही नाही .




             

रविवार, ३ जुलै, २०१६

।। पीडिता हे राष्ट्र देखोनि जग ।

            मी  मागील आठवड्यात बीडला कार्यक्रमासाठी गेलो होतो तेव्हा  जातांना जामखेड मार्गे गेलो व येतांना पाथर्डी मार्गे ( विशाखापटटण  महामार्ग) आलो . सांगायचे तात्पर्य मला कुठेही हिरवे गावात दिसले नाही कि कुठे पाणी दिसले नाही . मोठमोठे तलाव दिसत होते परंतु त्यात पाण्याचा थेंबही नव्हता . तापमान ४१ अंशापर्यंत गेलेले . रस्त्याने कुठेही पाखरे दिसली नहित. रस्त्यावर माणसे दिसत नव्हती …… कुठेतरी एखादा मजूर मनुष्य रस्त्याने विमनस्क अवस्थेत जातांना दिसत होता . १९७२ च्या दुष्कालापेक्षाही या वर्षीच्या दुष्काळाची तीव्रता फार आहे . विशेष करून मराठवाड्यात जास्त आहे . बीड परिसरातील काही लोक मुंबईला निघून गेले आहेत कारण  येथे हाताला काम नाही शेते ओसाड पडली सरकार फार काही करते असे नाही . सर्व सामान्य लोक तर सरकारवर नाराज आहेत . सत्तेतील लोक म्हणतात " या लोकांना फुकट घ्यायची सवय लागली आहे ." अरे ! पण साधी गोष्ट आहे ज्या भागात पाणी नाही, हाताला काम नाही, जिथे पशु पक्षीही राह्यला तयार नाहीत तिथे माणसांची गोष्ट किती भयानक आहे . ६-७ परस खोल विहिरीत छोटे छोटे मुले जीव मुठीत धरून पाण्यासाठी उतरतात आणि विहिरीच्या तळाशी असलेले " चुल्लूभर " पाणी छोट्या वाटीने  भरतात . अर्धा ते एक तास हा प्रकार केल्यानंतर एक हंडा भरतो व विहिरावर कमीत कमी १००-२०० लोकांची रांग लागलेली तेही बरेचसे वृध्द कारण त्यांना गांव सोडता आलेला नाही . त्यांचे उदासवाणे चेहरे भेडसावतात . भविष्यात काय लिहिले हे कोणालाच माहित नाही . छावण्या कुठे कुठे दिसतात पण त्यातही कडक नियमावलीमुळे जास्त छावण्या नाहीत . चोरून लपून नाही म्हटले तरी काही जनावरे कसायाच्या तावडीत जात अहेत. शेतकरी आत्महत्या करीत अहेत. त्याचाही काही नेते , पुढारी, समाज सुधारक (?) सिने अभिनेते तुटपुंजी मदत करून,  शेतकऱ्यांच्या विधवा स्त्रियांना मदतीचा चेक देऊन छानपैकी फोटो काढून पेपरमध्ये छापून आणतात हि मोठे दयनीय अवस्था आहे सरकार म्हणते ," शेतकऱ्यांना आम्ही आधी सक्षम करू मग त्यांना कर्जच काढण्याची गरज राहणार नाही " हे एक वेळ खरे मानले तरी सध्याची स्थिती तसी नाही शेतकरी पार खचून गेला आहे . शेततळे अगोदर तुम्ही तयार करा मग आम्ही तुमच्या खात्यावर पैसे जमा करू ." लाल फितीतील कारभार तर जगजाहीर आहे . भ्रष्टाचारामध्ये भारत वरच्या क्रमांकावर आहे . कार्यलयात शेतकऱ्याला काय किमत आहे हे सर्वांनाच  माहित आहे . अल्प भू धारक शेतकर्यासाठी खरेच " आरक्षणाची " गरज आहे . पण ! (?) शेतकऱ्याचा विचार करायला वेळ नाही . वर त्याला "बळी राजा "म्हणायचे . तो तर  केव्हाच   पाताळात घातला आहे , "तुका म्हणे बळी । जीव दिला पायातळी ।।" "उत्तम शेती, मध्यम व्यापार ,आणि कनिष्ट नोकरी " हि म्हण ज्याने कोणी सुरु केली त्याने काय विचार केला असेल त्याचे त्यालाच माहित पण ! आज मात्र उलट झाले आहे शेती कनिष्ट झाली आहे . शेतकऱ्याच्या मुलाला मुलगीहि देण्याचे धाडस कोणी करीत नाही . अशा अनेक अडचणी आहेत .
                     जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या काळात सलग बारा वर्षे दुष्काळ पडला होता . पण तेव्हा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आढळत नाही . कारण " योजकस्तत्र दुर्लभ: ।।" योजना करणारा दुर्लभ असतो . त्यावेळी तुकाराम महाराज हे मोठे पिढीजात सावकार  होते , बारा बैलाची दावण होती , पनवेलपर्यंत त्यांचा व्यापार होता गडगंज श्रीमंत होते . धान्याची कोठारे होते. आणि अशा या दुष्काळात महाराजांचे हृदय द्रवले "न घडे यावरी न धरवे धीर । पीड्ता हे राष्ट्र देखोनि जग ॥३॥" आणि त्यांनी एक धाडशी निर्णय घेतला . धाकटा भाऊ " कान्होबा " याला बरोबर घेतले आणि दोघे भाऊ इंद्रायणीच्या तीरावर बसले आणि एक विचाराने निर्णय घेतला कि सर्व शेतकऱ्यांची कर्ज खाते फाडून टाकायची आणि दुसर्याच दिवसी सर्व गोर गरिबांना बोलावून घेतले व त्यांच्या देखत सर्व कर्ज खाते इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकली . व्याजासगट मुद्दल माफ करून टाकले . व स्वत:च्या कोठारातून सर्वांना धान्य वाटून टाकले . सर्व तळागाळातला समाज सुखी झाला . विशेष म्हणजे जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचे हे कृत्य बघून छत्रपती शिवरायांनी सुद्धा संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांचा शेतसारा माफ केला शिवाय पेरणीच्या वेळी व्यापार्यांना  शेतकऱ्यांना  बियाणे मोफत देण्यास प्रवृत्त केले व त्याचे पैसे राजकोषातून अदा केले . हि होती राजनीती आणि धर्मनीती .
                         तात्पर्य आपण इतिहास विसरलो आणि त्यामुळे प्रजा सुद्धा शासनावर नाराज होऊ  शकते व त्याचा परिणाम पुढील निवडणुकीत दिसू शकतो . पण ! राजकारणी मोठे धूर्त असतात शेवटच्या दिवसात सगळे माफ करतील आणि लोकमत पुन्हा आपल्याकडे वळवतील …… हे सृष्टी चक्र असेच चालू राहील आणि नंतर  मात्र पश्चातापालाही जागा राहणार नाही .
                      दुष्काळ पुन्हा येऊ नये असे वाटत असेल तर प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावले पाहिजे " वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे ।" हे आम्ही फक्त म्हणतो पण बेसुमार वृक्ष तोड आपणच करतो त्यासाठी आपण एक केले पाहिजे घरी वेगवेगळ्या फळांच्या बिया जमा कराव्यात आणि बाहेर कुठेही निघालो कि जवळ एखादे खुरपे किंवा तत्सम काहीतरी ठेवावे आणि डोंगरात, रस्त्याच्या कडेला पाऊस सुरु झाला कि ते बीज लावावे त्यायोगेच वृक्षराजी पुन्हा बहरेल आणि वेळेवर पाऊसहि येईल . रोग व्हायच्या आधी काळजी घेतली तर रोग होत नसतो . तेव्हा आता हि नुसती सरकारची जबाबदारी राहिली नाही तर प्रत्येक नागरिकाची आहे . पोटाच्या लेकारासारखे झाडाला जपले तरच तुम्हाला निसर्ग सांभाळील अन्यथा वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यात सुद्धा काही अर्थ नाही "पश्च्यात म्हणजे नंतर , नंतरचा ताप " तेव्हा मित्रांनो सावध व्हा आणि एक तर झाड लावा .
    रामकृष्ण हरी ।