सोमवार, १९ जून, २०१७

   ।। होय होय वारकरी ।।
जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी सांगितले आहे कि पंढरी बघायची असेल तर तुला वारकरीच व्हावे लागेल . कारण पंढरीचा महिमा असा आहे कि तो वारकरी झाल्याशिवाय कळत नाही त्यासाठी वारकरी व्हावे लागेल " होय होय व वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ।। " वारकरी होऊन वारीत सामील होण्याबाबत कोणाची काही तक्रार असण्याचे कारण नाही ..... काल -परवा कोणी धारकरी माऊलीच्या पालखीच्या पुढे तलवारी वगैरे घेऊन आले कदाचित ते त्यांची कला सादर करीत असतील ...पण वारीचे काही नियम असतात. पालखीच्या मार्गावरील काही पद्धती असतात. ते नियम पाळायला काय हरकत आहे . गर्दी दिसली कि घे आपली पोळी भाजून ! अहो निळोबारायानंतर संत झाले नाही का ? पण त्याचे सुद्धा अभंग काव्य प्रमाण धरले जात नाही , हा दंडक आहे आणि तो पळाला पाहिजे . छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला येत तेव्हा ते त्यांचा लवाजमा बाजूला ठेवून येत . तुम्ही तुमचे वारकरी संप्रदायात घुसडयाचे काही कारण नाही . उद्या कोणीही उठेल आणि दिंडीमध्ये सामील होऊन आम्हाला आमची कला सादर करायची म्हणेल तर ते चालणार नाही . " हाती टाळ दिंडी घेऊनि नाचा ।।" असा आदेश संतांचा आहे तलवारी नव्हे !! तलवारीचे क्षेत्र वेगळे आहे . वारीत सरमिसळ कशासाठी ? प्रत्येकाला आपण व्यक्त व्हावे वाटते. पण त्याला मार्ग भिन्न आहेत. काही कर्मठ वारकऱ्यांमध्ये घुसले आहेत आणि नको त्या पद्धती सुरु करीत असतील तर त्या तिथेच रोखल्याही पाहिजेत. वारकरी संप्रदायाची संप्रदायाची आचारसंहिता आहे.
लोकमान्य टिळक आणि ह भ प श्री जोग महाराज हे मित्र होते , ते दोघे एकदा पंढरपूरला गेले व पांडुरंगाच्या दर्शनाची एक विशिष्ट पद्धत आहे . अगोदर श्री चोखोबार्यांचे समाधीचे दर्शन , नंतर श्री नामदेव पायरीचे दर्शन त्यानंतर आत गेल्यावर गरुड खांबाचे दर्शन व पुढे मग पांडुरंगाचे दर्शन व याप्रमाणे दोघांनी दर्शन झाल्यावर गाभाऱ्यात आले व जोग महाराजांनी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे दोन्ही हातानी आपले कान धरून उडी मारली ... व टिळकांना पण म्हणाले कि " येथे आपले कां धरून उडी मारावी लागते " तर टिळक म्हणाले " मी इंग्रज सरकारचे कान धरतो , माझे नाही ". जोग महाराज म्हणाले "इंग्रजांचे कान धरण्यासाठी बळ हवे असेल तर अगोदर पांडुरंगासमोर आपले कान धरावे लागतील " टिळकांनी लगेच स्वतः:चे कां धरले आणि उडी मारली . तात्पर्य वारकरी संप्रदायाचे नियम हे सगळ्यांनी पाळायचे असतात. व ती शिस्त पालन करून घेण्याची जबाबदारी चोपदारांची असते म्हणून त्यांनी जर आपल्याला तसे सांगितले तर त्यांचा राग यायचे काही कारण नाही . ज्याच्या त्याच्या क्षेत्राचे ज्याचे त्यालाच माहित असते. दिंडी सोहळा म्हणजे काही फुटकळ उत्सव नाही त्याला एक शिस्त आहे.
एकदा दिंडी प्रस्थानाचे वेळी काही दिंडी चालकांमध्ये मतभेद झाले व पोलीस फोर्स बोलवावा लागला पण लोक काही ऐकेनात तेव्हा ह भ प मामा दांडेकर होते एस पी मामांना म्हणाले " मामा आता यांच्यावर लाठी चार्ज करता येणार नाही व यांना आवरताही येत नाही काय करावे काही कळत नाही " मामा म्हणाले " साहेब तुम्ही काही काळजी करू नका ... आमच्या वारकऱ्यांना शिस्त आहे ते कोणाचे ऐकणार नाहीत पण माऊलीच्या सेवकाचे नक्की ऐकणार ." आणि मामांनी चोपदाराला कल्पना दिली , काय सांगावे ! चोपदाराने रथावर जाऊन एक ललकारी दिली आणि त्याच्या हातातील दंड उंच धरला , काही क्षणात सर्व वारकरी समाज एकदम शांत झाला व चोपदार काय सांगतो हे कां टवकारून ऐकू लागला . तात्पर्य हि आहे वारकरी संप्रदायाची शिस्त . हि मोडण्याचा कोणीही प्रयत्न करू नये आणि आपले काही नवीन मांडण्याच्या भानगडीत पडू नये . तो वारकऱ्यांचा अपमान ठरेल . ह भ प राजाभाऊ चोपदार माउलीचे चोपदार त्यांच्या शिस्तीचे सर्वांनी आदराने पालन करावे त्यांना तो अधिकार आहे . राजाभाऊ तसे वैक्तिक जीवनात खरेच खूप नम्र आहेत. हजारो वारकरी त्यांना आदराने ओळखतात. तेव्हा त्यांच्या कृतीचे मी समर्थन करतो . रामकृष्ण हरी ।
हि पोस्ट कुठल्याही अभिनिवेशाने लिहली नाही नि:पक्षपातीपणाने लिहली आहे तेव्हा कोणी उगीच ओढाताण करू नये आणि विषयांतर करण्याचे प्रयत्न करू नये . मी त्याला किंमत देणार नाही याचे नोंद घ्यावी
अशोकानंद महाराज कर्डीले

मंगळवार, १४ मार्च, २०१७

धन्य म्हणवीन इहलोकी लोका । भाग्य आम्ही तुका देखियेला ।।


जय हरी !
धन्य म्हणवीन इहलोकी लोका । भाग्य आम्ही तुका देखियेला ।।
वारकरी संप्रदायातील भागवत धर्म मंदिराचे कळस असणारे जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा आज निर्याण दिवस म्हणजेच " बीजोत्सव". ज्ञानदेवे रचिला पाया । तुका झालासे कळस ।। असे तुकाराम महाराजांची शिष्या  संत बहिणाबाई पाठक यांनी म्हटले आहे. ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी लिहितांना श्रीमद भगवद गीतेचा आधार होता ," पदाची कोर न सांडी ।।" हि त्यांना मर्यादा होती , भगवंताचे मनोगत सांगायचे होते. तसे तुकोबारायांना गाथा लिहितांना बंधन नव्हते त्यामुळे गाथ्यामध्ये सर्व विषय आलेले आहेत. व या स्वातंत्र्यामुळेच तुकोबाराय तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर परखडपणे बोलू शकले. नाही भीड भार । तुका म्हणे साना थोर ।।... सत्याचिये साठी नाही भीड भार । आप आणि पर दोन्ही नाही ।।  सत्य सांगण्याकरिता महाराजांनी कोणाचाही मुलाहिजा राखला नाही . वास्तविक पाहता तत्कालीन परिस्थती अत्यंत सनातनी व जातीभेद , वर्णभेद मानणारी होती . अशा प्रतिकूल काळात तुकाराम महाराजांचा अवतार झाला होता. महाराजांनी सनातनी व्यवस्थेविरुद्ध उघडपणे बंड पुकारले होते , ढोंगी महाराज , अभक्त ब्राहमण , फुटकळ दैवते, याविषयी महाराजांनी परखडपणे लिहले . म्हणून ते सर्वात श्रेष्ठ क्रांतिकारी संत ठरले . तसेच ते समाजाभिमुख समाजसेवक सुद्धा होते. देहू परिसरात बारा वर्षे दुष्काळ पडला अशा वेळी महाजांनी आपली धान्याची कोठारे जनतेसाठी खुली केली , सर्व धान्य वाटून टाकले . महाराज हे महाजनकीचा व्यवसाय सुद्धा करीत होते . त्यांनी ओळखले कि पाऊस नसल्यामुळे  गरीब लोक आता आपले व्याज सुद्धा देऊ शकणार नाहीत तेव्हा त्यांनी जेव्हढ्या कर्जाच्या वह्या होत्या त्या सर्व वह्या इंद्रायणीत बुडवून टाकल्या  लोकांना कर्जमुक्त केले , त्यांचा " सातबारा कोरा केला ". हा तुकाराम महाराजांचा आदर्श घेऊन हल्लीच्या सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे पण गेंड्याची कातडी असलेले सरकार त्यांच्याही लोकांचे व विरोधकांचे ऐकायला तयार नाही . तसेच तुकोबाराय उत्कृष्ट व्यापारी अर्थतज्ज्ञ होते. " याती शूद्र केला वैश्य केला व्यवसाव ।। " हे महाराजांनी स्वत:च म्हणून ठेवले आहे. ते उत्कृष्ट शेतकरी होते . " एका बीज केला नाश । मग भोगिले कणीस ।।" व अशाच शेतीवरील त्यांच्या अभंगावरून लक्षात येते.
         महाराजांनी वेद , पुराणादिकांचा अभ्यास देखील केला होता. " पाहिली पुराणे । धांडोळिली दर्शने ।। " अठरा पुराणे आणि षड दर्शने महाराजांनी अभ्यासली होती . त्यावेळी हे ग्रंथ भाषांतरित झालेले नव्हते ते सर्व संस्कृतमध्येच होते. म्हणजे महाराजांना संस्कृत उत्तम येत होते. शिवाय त्यांना प्रत्यक्ष पांडुरंगाने दर्शन देऊन अनुग्रह दिला होता. " माझ्या विठाबाचा कैसा प्रेमभाव । आपणचि देव होय गुरु ।। किंवा पांडुरंगे सत्य केला अनुग्रह । निरसोनि संदेह बुद्धी भेद ।।" नामदेवराय व पांडुरंग हे साक्षात भेटले आणि कवित्व करायची आज्ञा केली . सखा कृपावंत वाचा त्याची म्हणून त्यांच्या मुखवटे अभंग वाणी बाहेर पडू लागली .... वेदाचा तो अर्थ अम्हासीच ठावा । येरांनी वाहवा भार माथा ।। खादल्याची गोडी देखिल्यासी नाही । भार धन वाहे मजुरीचे ।। किंवा तुका तरी सहज बोले वाणी । त्याचे घरी वेदांत वाहे पाणी ।। व एव्हढेच बोलून महाराज थांबले नाही तर त्यांनी वेदाचे मनोगत सुद्धा सांगितले " वेद अनंत बोलिला । अर्थ इतुकाची साधिला  । विठाबासी शरण जावे । निजनिष्ठे नाम गावे ।। आम्ही नुसते वेदाचे पाठक नसून आम्हाला त्याचा यथार्थ अर्थ सुद्धा कळतो .... नेणती वेद श्रुती कोणी । आम्हा भविकावाचूनि ।। तुका म्हणे नाही श्रुती आतुडलें । आम्हा सापडले गीता गाता ।। किंवा शास्त्राचे जे सार वेदाची जो मूर्ती । तो माझा सांगाती प्राणसखा । म्हणुनी नाही अनिकाचा पांग ।। केव्हडा हा आत्मविश्वास आणि अनुभूती . आणि नेमके हेच तत्कालीन पंडित आणि पुरोहित वर्गाला सहन झाले नाही त्यांना विविध प्रकारे छळण्यास सुरवात झाली . पण महाराज त्यांच्या विरोधाला जुमानीत नव्हते उलट आणखी स्पष्ट लिहू लागले " न पढवे वेद नव्हे शास्त्र बोध । नामाचे प्रबंध पाठ करा ।।.... निगमाचे वन नको शोधू करू शीण ।। .... व्यर्थ भराभर पाठांतर काय कामाचे . घोडे काय ओझे वागवीत नाहीत ? पण त्यांना त्यातील काही कळते का ? म्हणून न लगे सांडणे मांडणे । अगं निगमाचे देखणे ।। न लगे पाहावे अबद्ध वाकडे । उच्चारावे कोडे नाम तुझे ।। .. आणि नाही वेळ नाही पंडिताचा धाक । होत का वाचक वेदवक्ते ।। न मनी ते ज्ञानी न मनी ते पंडित । ऐसे परीचे एकएक भावे ।। धातू पोसोनिया आणिक उपदेश । अंतरितो   लेश प्रेम नाही ।। व ब्राहमण तो नव्हे ऐसी ज्याची बुद्धी । पहा श्रुतीमधी विचारूनि ।। असे परखड विचार महाराजांनी मांडले . आणि ते या उच्चवर्णीयांना सहन झाले नाही मग त्यांनी नाना प्रकारे महाराजांना त्रास द्यायला सुरवात केली .  तितक्याच प्रमाणात त्यांना उत्तर दिले " सकळांसी येथे आहे अधिकार । कलियुगी उद्धार हरीच्या नामे ।। किंवा ब्राहमण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा आहे अधिकार । बाळे नारीनर अदीकरोनी वेश्याही ।। " परमार्थाच्या क्षेत्रात महाराजांनी मोठी जनजागृती केली . त्यामुळेच पुरोहित वर्ग नाराज झाला कारण त्यांचे पोट भरणे हे लोकांच्या अज्ञानात असते. त्यामुळे पंडित लोक खोडी काढू लागले. किंबहुना कोर्ट कचेरीमध्ये दावे दाखल झाले महाराजांना त्यांच्या अभंगाच्या वह्या बुडवायला आदेश दिले गेले. तेरा दिवस उपोषण केले व त्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीत तरल्या ताशा त्या लोकगंगेतही तरल्या . पण मनस्ताप खूप झाला. गावचे लोकही त्यांचेच खाऊन त्यांच्या विरोधात गेले . " कोपला पाटील गावीचे हे लोक । आता मज भीक कोण घाली ।।" अशी भ्रांत पडली कारण धर्मसत्तेपुढे कोणाचेही चालत नव्हते ... साक्षात छत्रपति शिवाजी महाराजांना सुद्धा दोन वेळा राज्याभिषेक करावा लागला .
         चमत्कार व अंगात येणे अशा प्रकारांना महाराजांनी कधीच महत्व दिले नाही . अंगे भारोनिया वारे दया देती । तया भक्ता हाती चोट आहे।। मांत्रिक हा काळतोंड्या कुत्र्यासारखा आहे . वनात जाण्याची गरज नाही . कासया करावे तापाचे डोंगर ? रिद्धी सिद्धी यांचे दास आम्ही होणार नाही . भगवे कपडे घालून लोकांना भुलवयाचे काम आम्ही करणार नाही . उलट भगवे तरी श्वान । सहज वेष त्याचा ।। किंवा भिक्षापात्र अबलंबिणे । जालो जिणे लाजिरवाणे ।। भिक्षा मागून भगवे कपडे करून जगणे म्हणजे लाजिरवाणे आहे . स्वत: कष्ट न करता दुसऱ्याच्या जीवावर जगणे हे चांगले नाही . परमार्थातील दांभिकपणावर महाराजांनी कोरडे ओढले.
           मोक्ष सुख हाणू लाता । भय नाही जन्म घेता ।। असे म्हणून त्यांनी मोक्षाचे स्वरूप काय आहे हे समजावून सांगितले . बंध  आणि मोक्ष या दोन्ही कल्पना आहेत. किंबहुना " रज्जू सर्पाकार । भासियले जगडंबर ।। " हा विवर्तवादातील सिद्धांत त्यांनी सांगितला . जगत मिथ्यत्व प्रतिपादन करून ब्रह्माचे सत्यत्व प्रतिपादन केले . सत्य तू सत्य तू सत्य विठ्ठला । का गा हा दाविला जगदाकार ।। , सत्य साच खरे । नाम विठोबाचे बरे ।। आणि एवढे असूनही भक्तिमार्गाचे महत्व अनन्यसाधारण आहे हेच सांगितले " भक्ती पंथ बहू सोपा । पुण्य नागवे पापा ।। भक्तीचा जिव्हाळा ज्याला आहे तोच मला आवडतो दुसरा कोण पंडित महाज्ञानी असला तरी त्याला मी मान्यता देत नाही. महाराजांनी परमार्थ सोपा करून तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवला . महाराजांचे हे कार्य पारमार्थिक क्षेत्रातील दिग्गजांना धक्का देणारी होती .
             " वैकुंठा जावया तापाचे सायास । करणे लागे जिवा नाश बहू ।। आणि म्हणून वैकुंठीचा देव आणिला भूतळा। धन्य तो आगळा पुंडलिक ।। वैकुंठादिक स्वर्ग सुख सुद्धा तुच्छ करून टाकली . नको वैकुंठीचा वास । तया सुखा आहे नाश ।। या न्यायाने त्यांनी जगत मिथ्यत्व अनुभूतीने जगालाही पटवून दिले . व आम्ही ब्रह्मदेवाचे बाप आहोत , स्वयंभू आहोत हेही ठणकावून सांगितले " तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते । स्वयंभू आइतें केले नव्हो ।।" तात्विक, उपदेशपर, करुणापर, वेदान्तापर,अशा विविध प्रकारची अभंग रचना केली आणि " पीडिता हे राष्ट्र देखोनि जग ।।" राष्ट्राची व जगाची पीडा बघवेना , प्रस्थापितांचा छळ , आणि देहीच विदेही भोगू दशा ।। हि महाराजांची प्रतिभ अनुभूती त्यामुळे शरीराचे तादात्म्य राहिले नाही . " झाला प्रेतरूप शरीराचा भाव ।।"... आता ह्या जगात राहू वाटेना आणि मी आता आपुल्या माहेराला जाईन .. मी कृतकृत्य झालो आहे. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो ।। अशी माझी स्थिती आहे. म्हणून " जातो आता आज्ञा घेऊनिया स्वामी । काळक्षेप आम्ही करू कोठे ।।आता मी जातो ..... मला शेवटचे चिन्ह दिसू लागले आहेत. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला । गरुडावर बैसोनि माझा कैवारी आला ।। .... आता माझे कर्तव्य संपले आहे ,माझ्या कीर्तनात लोकांना जो आनंद मिळेल तो कुठेही मिळणार नाही. " कडू स्वर्गवास करिन भोग ।।"स्वर्गादि सुखोपभोग सुद्धा माझ्या कीर्तनापुढे तुच्छ वाटतील . लोकही म्हणतील ," धन्य म्हणावीन इहलोकी लोका । भाग्य आम्ही तुका देखियेला ।।",  देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो ।। या नामदेव महारांजाच्या उक्तीप्रमाणे जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचे आज म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीया या तिथीवर निर्याण झाले . त्यांचा अभंग गाथा हेच त्यांचे खरे वाङ्मयरूप आहे. तुकोबाराय जर समजावून घ्यायचे असतील तर त्यांचा अभंग गाथा अर्थारुद्ध होऊन वाचला कीं खरे तुकाराम महाराज समाजातील म्हणून प्रत्येकाने आपल्या घरात गाथा अवश्य ठेवावा. रामकृष्ण हरी ।।

-भगवंताचार्य अशोकानंद महाराज कर्डीले  

मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०१६

परी मी त्यासी न म्हणे संत

करिशी ते देवा करि माझे सूखे । परी मी त्यासी न म्हणे संत ॥१॥
जया राज्य द्रव्य करणे उपार्जना । वश दंभ माना इच्छे झाले || २॥
जग देव परी निवडीन निराळे । ज्ञानाचे आंधळे भार वाही ।।३।।
तुका म्हणे भय न धरी मानसी । ऐशियाचे विशी करिता दंड ।।४।।
परमार्थ मार्ग म्हणावा तसा सोपा नाही . आज सकाळपासून विविध घडामोडी घडत आहेत . त्यात काही परमार्थातील आहेत काही राजकारणातील आहेत . एकमेकांची अब्रू चोहट्यावर आणण्यात धन्यता मानतात . " मतामतांचा गलबला । कोणीच ऐकेना कोणाला । थोर म्हणताच । वाया गेला ।।" हे एक संत वाचन आहे . संत नव्हती जागा माणसाच्या सारिखे ।। संत हे सांसारिक माणसासारखे नसतात. त्यांना कुठलीही उपाधी आवडत नाही . उपाधिरहित जीवन हे खरे संत जीवन असते . " मांडीना स्वतंत्र फड । अंगी अहंता येईन वाड ।।" हे नाथरायांनी चिरंजीवपदात सांगून ठेवले आहे पण ! कोण ऐकतो ? गड, फड , या उपाधीने महाराज शोभत नाही तर तो स्वरुपस्थितीने शोभत असतो . राजकारण आणि परमार्थ या दोन वेगळ्या बाजू आहेत . त्याची सरमिसळ होता कामा नये .
एकदा जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांना एकाने संत कसे असतात असे विचारले ? तेव्हा त्याचे उत्तर त्यांनी दिले ते म्हणतात " हे देवा ! माझे काय व्हायचे ते होवो पण ! अशा व्यक्तीला संत म्हणणार नाही , ज्याला राजकारण करून परमार्थ करायचा , द्रव्य मिळवायचे,व आपले पोट भरायचे , ज्याच्या मनामध्ये दंभ आहे , दंभ म्हणजे असतो एक आणि दाखवतो दुसरेच , आणि इच्छेचे अधीन ज्याचे जीणे झाले आहे . अशा व्यक्तीला मी संत म्हणणार नाही . वास्तविक जगत ब्रहम आहे , देव आहे तरीही मी निवडनिवड करिन ज्यांना आत्मज्ञान नाही केवळ राजकारण करून आपले संतपण, महंतपण टिकवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न जो करतो तो ज्ञानदृष्टी नसलेला आंधळा आहे असा व्यक्ती नुसता भारवाही हमाल आहे. त्याचे संतजीवन , महंतपण व्यर्थ आहे. जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या काळी सुद्धा असे काही महंत होतेही त्यांचा महाराजांनी तीव्र शबदात निषेध केलेला आहे. " भिक्षा पात्र अवलंबिणे । जळो जीणे लाजिरवाणे ।।" कष्ट न करता , ज्ञान नसताना भिक्षा मागणे हे लाजिरवाणे जीणे आहे . " हरिभजनें हे ढवळीले जग । चुकविला लाग कळिकाळाचा ।।" हे साधूचे काम आहे . आता कुठेही पाहावे तर साधू ,महंतांच्या मारामाऱ्या , कुंभमेळ्यात तर तलवारीने मारामाऱ्या होतात हे ऐकणाऱ्याला लाज वाटते महंतपद, मंडलेश्वर , महामंडलेश्वर या पदव्या मिळवण्यासाठी लाखो रुपये द्यावे लागतात हे वास्तव आहे . जगद्गुरू श्री तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात कि " न होती ते संत करिता कवित्व । संतांचे ते आप्त नव्हती संत ।।१।। येथे नाही वेष सरते आडनाव ।निवाडे घावडावं व्हावा अंगी ।।२।। नव्हती ते संत धरीता भोपळा करिता वाकला प्रावरण ।।३।। नव्हती ते संत करिता कीर्तन । सांगता पुराणे नव्हती संत ।।४।। नव्हती ते संत वेदाच्या पठणे ।कर्म आचरणे नव्हती संत ।।५।। नव्हती संत करिता तप तीर्थाटणें । सेविल्या वन नव्हती संत ।।६।। नव्हती संत माळा मुद्रांच्या भूषणे । भस्म उधळणे नव्हती संत ।।७।। तुका म्हणे नाही निरसीला देह । तोवरी अवघे हे सांसारिक ।।८।। तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा जर विचार केला तर मला वाटत नाही एखादा तरी खरा संत सापडेल कि नाही ? आणि अशा दांभिक संतांविषयी महाराज म्हणतात कि अशा माणसाला दंड करण्यात मला बिलकुल भीती वाटत नाही . किंवा ज्याला दंड करण्याचा अधिकार आहे त्याने तरी भय भरू नये .

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०१६

खंडित शून्यवाद

जय हरी !  
अभावातून भावाची कधीही उत्पत्ती होत नसते व भावरूप पदार्थाचा कधीही अभाव होत नसतो . पण शून्यवादाची जे सहा नास्तिक तत्वज्ञान सांगणारे शास्त्रे आहेत ते म्हणतात कि " हे जग शून्यातून निर्माण झाले ". हे शून्यवादी अभाव प्रमाण मानतात पण विचार करा नसण्यातून असणे कधीच निर्माण होत नाही . शून्य म्हणजे अभाव . जगद्गुरू श्री तुकाराम महाराज म्हणतात " न झाला प्रपंच आहे परब्रहम ।अहं सोहम ब्रह्म आकळले ।।" कोणतेही मिथ्या पदार्थाला अधिष्ठान सत्य लागत असते . सत्य अधिष्ठानाशिवाय मिथ्या पदार्थ भासत नाही . शून्यवादी मात्र म्हणतो कि काहीहि जे नाही तेच जग निर्माण करते . किती हास्यास्पद आहे . " वांझेचीया पुत्रा कैची जन्म पत्रिका ।।" वांझेच्या मुलाला जन्मपत्रिका कशी असू शकेल ? तसे जग अधिष्ठानाशिवाय कसे दिसेल किंवा भासेल ? " रज्जू सर्पाकार। भासियेले जगदंबर ।।" असे तुकाराम महाराज म्हणतात. ( विवर्तवाद ) एके हाती दंतु । जो स्वभावाता खंडितु ।।... ज्ञा . तात्पर्य शून्यवाद हा स्वभावात:च खंडित आहे . एक सुंदर दृष्टांत आहे ... एक भिकारी एका घराच्या बाहेर उभा राहून भिक्षेकरिता हाक मारतो व म्हणतो " माई भिक्षा वाढा " आतील बाई म्हणते कि " पुढे जा पुढे ! घरात कोणी नाही . ! शून्यवादाची अशी स्थिती आहे कोणी नाही म्हणणारा कोणी तरी आहे ना ? म्हणजे नाही म्हणायचे त्याकरिता सुद्धा कोणीतरी अगोदर असावे लागते . आणि खरोखर कोणीच नसते तर कोणीच उत्तर दिले नसते . आणि म्हणे शून्यातून जग निर्मण झाले . कधी कधी एखादा माणूस म्हणतो सुद्धा " अहो ! माझ्या बापाने काहीहि केले नाही मीच सर्व शून्यातून निर्माण केले ." यालाच वदतो व्याघात दोष म्हणतात. "नासते विद्यते भावो नाभावो विद्यते संत:।। " वेदांत जग नाही असे म्हणत नाही तो म्हणतो जग आहे पण कसे " रज्जू सर्पवत " ते हि तुम्ही म्हणता म्हणून अगदी सोप सांगायचे तर व्यवहारात सुद्धा लोक म्हणतात "दिसत तस नसत म्हणून जग फसत " स्वप्नातील पदार्थ स्वप्न काली दिसतात पण जागे झाले कि ते मिथ्या ठरतात . स्वप्नातील पदार्थ हे अनिर्वाचिनीय व अतींद्रिय आहेत तरी पण ते भासतात . व जागे झाल्यावर त्याचे अस्तित्व संपते . तद्वत ब्रह्मज्ञान झाले कि जगद्भ्रास मिथ्या ठरतो .म्हणून अभाव प्रमा मानणारा शून्यवाद सहजच खंडित होतो .

शनिवार, १० सप्टेंबर, २०१६

।। परपीडे चित्त दुखी: होते ।।






जय हरी !

नवल र्तले! लाखा लाखाचे मोर्चे निघतात त्यामध्ये लोक शांतपणे चालतात कुठली घोषणा नाही, आरडा ओरडा नाही, "मूकपणे केलेला आक्रोश " सरकारला ऐकू गेला पाहिजे हि त्यांची धारणा आहे  . आत्मक्लेश करून घेणे हा आंदोलनाचा फार चांगला मार्ग आहे  . जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या वह्या इंद्रायणीत बुडविल्या तेव्हा महाराजांना किती क्लेश झाले , किती वेदना झाल्या ! पण त्यांनी प्रस्थापितांना दोष देत बसले नाही उलट १३ दिवस उपोषण केले व स्वतःला आत्मक्लेश करून घेतले आणि फलस्वरूप गाथा इंद्रायणीत व लोकगंगेत तरला . तसेच ह्या मोर्च्याचे कौतुक वाटते . कुठेही जाळपोळ नाही, फूटतूट नाही, उलट मोर्चा पुढे गेल्यावर स्वयंसेवक पाठीमागे स्वच्छता करतात . "मौनं सर्वार्थ साधनं ।।"हे सुभाषितकारांनी म्हटले ते किती सार्थ आहे . नेहमी बोलणार्यापेक्षा कधीही न बोलणारा जर बोलला तर तो मार्मिक बोलत असतो आणि अर्थपूर्ण बोलत असतो व त्याच्या बोलण्याचा परिणाम होत असतो. सतत बोलणार्यांची स्थिती उत्तरासारखी होते " बालिश बहू बायकांत बडबडला ।।" त्याची बडबड व्यर्थ ठरण्याची  शक्यता असते . कोणी नेता नाही ,  पुढारी नाही,इथे समाज मनच पेटून उठले आहे . अशीच एकी आणि संघटन जर मराठ्यांनी ठेवले तर ध्येय सध्या होणे अवघड नाही . जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी म्हटले आहे " यारे यारे लहान थोर । याती भलते नरी नर । करावा विचार । न लगे चिंता कोणासी ।।"  याप्रमाणे सर्वांना बरोबर घेऊन एक चांगला समाज  घडविण्याचे श्रेय मिळाल्याशिवाय राहणार नाही .

शुक्रवार, २ सप्टेंबर, २०१६

आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव





आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव । दैवताचे नाव सिद्धेश्वर ।।१।।
चौर्यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा । तो सुख सोहळा काय वर्णु ।।२।।

आळंदी हे तर अनादी काळापासूनचे सिध्दांचे क्षेत्र आहे , तेथे ब्रहमदेवापासून ते इंद्रापर्यंत  अनेकांनी यज्ञ याग करून हि भूमी पावन केली आहे. व माउलींनी येथे वास्तव्य केल्यापासून या तीर्थ क्षेत्राची तर महती फार वाढली व भागवत धर्म मंदिराचा पाया ज्ञानोबांनी रचला आणि वारकरी संप्रदायाला एक मोठे व्यासपीठ व अधिष्ठान मिळाले . या क्षेत्राची वाढ व महिती श्री नाथ बाबांनी व श्री जगद्गुरू तुकाराम महाराजांनी केले . तुकाराम महाराजांनी तर स्वखर्चाने जणिर्णोद्धार केला . तुकाराम महाराजांचे चिरंजीव श्री नारायणबाबांनी तर ज्ञानोबा -तुकोबांच्या पादुका एकाच रथात ठेऊन आळंदी ते पांढरी असा आषाढीचा सोहळा सुरु केला पुढे तो वेगवेगळा झाला . व पुढे हैबत बाबांनी तर माउलींच्या पादुका गळ्यात घेऊन पंढरीला गेले . तात्पर्य या क्षेत्राची माहिती दिवसेंदिवस वाढतच जातेय . या क्षेत्राने महाराष्ट्राला हजारो कीर्तनकार दिले आहेत.
            तीर्थक्षेत्राचे काही नियम असतात , तिथे जी नदी असते त्या नदीमध्ये साबण लावून  अंघोळ करायची नसते, नग्न होऊन स्नान करायचे नसते . त्या नदीमध्ये लघुशंका करायची नसते. साबण लावून कपडे धुवायचे नसतात . कारण भाविक लोक ते पाणी तीर्थ म्हणून प्राशन करीत असतात. हे तिथले पावित्र्य सांभाळले गेलेच पाहिजे व तशी व्यवस्था तेथे कार्यरत असावयास हवी . परवा मी आळंदीला माऊलीच्या दर्शनाला गेलो होतो तेव्हा इंद्रायणीवर तीर्थ घेण्यासाठी गेलो आणि बघितले तर घाटावर जिकडे तिकडे कचरा पडलेला व घाणीचे साम्राज्य पसरलेले, व अशाही ठिकाणी मात्र घाटाच्या कामासाठी व इतर व्यवस्थेसाठी नगरपालिकेचा/ संस्थानचा  पावती फाडण्याचा टेबल लावलेला .आणखी थोडे पुढे गेलो तेव्हा निदर्शनास आले कि जिथे तीर्थ घ्यायचे तिथे काही महिला खुशाल कपडे साबण लावून धूत होत्या आणि हाच प्रकार सर्वत्र होता . तीर्थ कसे घ्यावे हा एक प्रश्न पडला तिथे नगरपालिकेचा कोणीही सेक्युरिटी नव्हता कि कोणी स्वयंसेवकही नव्हता . लोक भावनेने नदीत  उतरत होते पाय धुवून बाहेर येत होते पण ! तीर्थ घेत नव्हते . पण या स्थानिक लोकांना कोण काय म्हणणार ? त्यांचे प्रबोधन कसे करणार ? भारतात सर्व तीर्थात यापेक्षा वेगळी स्थिती नाही . मा . प्रधानमंत्री श्री मोदी साहेबांनी स्वच्छतेचा नारा दिलेला आहे . पण हे काम एकट्याचे नाही . मी ऑस्ट्रेलियात गेलो होतो तेथील स्वच्छता कमालीची आहे . यारा नावाची नदी आहे तेथे आम्ही गेलो तेव्हा आम्ही बघितले कि नदीच्या किनाऱ्यावर कुठेही कचरा घाण दिसली नाही . त्या लोकांना ते जमते पण आपण का नाही असा विचार करत ? मानसिकताच खराब झाली आहे. अर्थात हे सर्व स्थानिक लोकच करतात असे नाही तिथे जाणारे यात्रेकरू सुद्धा घाण करतात . तर मित्रांनो आपण सुरवात आपल्यापासूनच करूयात कुठेही रस्त्यावर , घाटावर, पवित्र ठिकाणी आपण कोणत्याही स्वरूपाची घाण करायची नाही . नेहमी आपल्याबरोबर एका पिशवीत कागदी पिशव्या ठेवायच्या आणि आपल्याकडचे जे काही टाकाऊ असेल ते त्या पिशवीत टाकायचे व जिथे डस्ट बिन असेल तेथे ते टाकून द्यायचे . रामकृष्ण हरी !!

भगवंताचार्य अशोकानंद महाराज कर्डीले
              

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०१६

|| कामातुराणां भयं ना लज्जा ||

           


                  
                भारतीय तत्वज्ञानात चार पुरुषार्थ कल्पिलेले आहेत , धर्म , अर्थ , काम आणि मोक्ष . यातील दोन पुरुषार्थ म्हणजे अर्थ आणि काम जरी साधले गेले नाही तरी चालते परंतु धर्म आणि मोक्ष मात्र संपादन केलेच पाहिजेत . तसेच अर्थ आणि काम हे पुरुषार्थ तेव्हाच पुरुशर्थ ठरतात जेव्हा त्यांना " धर्माची " चौकट असते " वेचोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी ।।" या तुकोबाच्या म्हणण्याप्रमाणे जर धन कमावले तर तो पुरुषार्थ ठरतो पण जर   म्हणजेच भ्रष्टाचाराने पैसा कमावला कि तो पुरुषापरध ठरतो . तसेच काम या पुरुषार्थाचे सुद्धा आहे " धर्माविरुद्ध भुतेषु कामोस्मि भारतषर्भ ।।" धर्मानुकूल काम हा पुरुषार्थ असतो . धर्माने विहित , निषिद्ध , काम्य, प्रायश्चित , कर्म अकर्म, विकर्म असे वेगवेगळे कर्माचे प्रकार सांगितले आहेत नित्य , नैमित्तिक कर्मे केलीच पाहिजेत व निषिद्ध कर्मे करूच नयेत व झालीच तर त्यासाठी वेगवेगळे प्रायश्चित कर्मे आहेत . असो काम म्हणजे इच्छा त्यातही सदिच्छा वेगळी आणि असदिच्छा वेगळी . समाजाची घडी नीट चालावी यासाठी धर्माने हे नियोजन केले आहे. पण आपल्यला माहित आहे कि कितीही चांगले नियोजन करा त्यात अम्मलबजावणी नीट होईल असे नाही . त्यात दोष राहतो आणि त्याचे परिणाम वाईट होतात .
                  चांगली प्रजा उत्पन्न व्हावी म्हणून धर्माने काम या विषयाला पुरुषार्थ ठरवले आणि त्याचे योग्य नियमन व नियोजन केले तर चांगली प्रजा उत्पन्न होते याचे अनेक उदाहरणे आहेत. व कामाचे योग्य नियोजन न झाल्यामुळे भल्या भल्या व्यक्तींनी अत्याचार केल्याचे उदाहरणे आहेत . इतिहास पुराणातील उदाहरणे दिली कि हे म्हणतात पुराणातील वांगे पुराणात पण मित्रांनो तसे नाही ती एक प्रवृत्ती  आहे तिला काळाचे बंधन नाही . रावणासारख्याला काही कमी  नव्हते पण त्याने सुद्धा " हेमा " नावाच्या अप्सरेवर बलात्कार केला होता . तो पंडित होता ज्ञानी होता तरीही वासनेवर नियंत्रण मिळवू शकला नाही . इंद्राने वासनेपोटीच अहल्येशी समागम केला आणि शाप पदरात पडला . " महाराजांचा एक अभंग आहे "वासनेच्या सांगे नको जाऊ मना ।पहा त्या रावणा काय झाले ।।१।।।इंद्रा पडले भाग चंद्र झाला काळा । नारद चुकला चाळा भजनाचा ।।२।। " किंवा नाथ बाबा सांगतात कि " एडका मदन , केवळ पंचानन । धडक मारली शंकरा । केला ब्रह्मयाचा मातेरा ।।इंद्र चंद्रासी लाविला दरारा जेणे ।। तो जाण  केवळ पंचानन ।।" हि सगळी मोठ्यांची यादी आहे ज्यांना विधी निषेधाचे ज्ञान आहे अशांना वासना ताब्यात ठेवता अली नाही . अगदी ब्रहादेव तर स्वात:च्या मुलीच्या मागे वासनेने धावत होता . " ब्रम्हा डोलसते वेदार्थ ना कळे । तेथे हे आंधळे व्यर्थ होती ।। वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष । वेडे नाही ऐसे सांगितले ।।" पण इकडे बघितले तर संत मंडळी मात्र सद्विचाराने " काम " या विषयावर मात  करू शकली . " जाई वो माते न करी सायास । आम्ही विष्णुदास तैसे नोहो ।। तुका म्हणे तुज जरी पाहिजे भ्रतार । तरी का इतर लोक थोडे ।।" याचा परिणाम असा झाला कि ज्या वाईट विचाराने ती श्त्री अली होती तीच बदलली आणि त्यांची अनुयायी झाली . म्हणून नियंत्रित काम हा पुरुषर्थ आहे आणि अनियंत्रित काम हा विनाशाला कारणीभूत होतो .
                      अनियंत्रित काम वासनेतूनच बलात्कार, अत्याचार असे  घडत असतात . अशा या वासनांध लोकांवर नियंत्रण  दोन प्रकारे ठेवले जाते १) संस्कारद्वारे २) कायद्याद्वारे ... रांझ्याच्या पाटलाने एका तरुण स्त्रीवर अत्याचार केला असता छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा" चौरंग " केला म्हणजे हात पाय तोडून गाढवावरून धिंड काढली मग लोकांना कळले कि असे काही केले कि असे होऊ शकते . कामातुराणां भयं न लज्जा  वासनांध माणसाला भय वाटत नाही आणि लाजहि वाटत नाही . कायद्याचे भय नाही आणि नीतीची चाड नाही  . आता लोकशाही आहे अशा जबर शिक्षा होत नाहीत किंबहुना असे म्हटले जाते कि १०० गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका  निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता कामा नये . असे जर असेल तर गुन्हेगार कोर्टातून सुटून जातात हा आपला अनुभव आहे . तुकाराम महाराज सुद्धा एके ठिकाणी म्हणतात " काय करू देवा सत्ता नाही हाती । दंडुनी पुढती लावू वाटे ।" हे देवा सत्ता हातात नाही , नाही तर असे अन्यायी अत्याचारी लोकांना मीच दंड केला असता . सत्ता परिवर्तन घडवते म्हणतात पण सत्ता ज्याच्या हातात आहे त्याची मानसिकता हवी . आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल मी का लिहतोय " कोपर्डीची " घटना सर्वांना ज्ञात आहे , दिल्लीत जेव्हा निर्भयाकांड झाले तेव्हा साऱ्या जगाने  दखल घेतली सो कॉल्ड सोफिस्टिकेटेड लोक तर मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरले होते .... ते योग्यच होते यात वाद नाही पण कोपर्डीची घटना त्याहून भयानक होती पण ! या घटनेला जातीय रंग देऊन दोन समाजात तेढ उत्त्पन्न झाली . आता हे दुष्टचक्र किती दिवस चालणार आहे . जाती जातीमध्ये सलोखा निर्माण होऊ शकत नाही का ? या सर्व गोष्टीला राजकारण कारणीभूत आहे . प्रत्येकजण जण तापलेल्या तव्यावर आपली पोळी भाजून घेत असतो , फोटो छापून आणीत असतो . " तुका म्हणे ऐश्या नरा । मोजनि माराव्या पैजांरा ।।" किंवा तुका म्हणे याच्या थुंका तोंडावरी । जातो यमपुरी भोगाव्या ।।" हा महाराजांचा सात्विक संताप आहे . दुर्दैव असे आहे कि आता जेलमध्येही या अशा लोकांची मोठी बडदास्त ठेवली जाते , तिथेहि हे गुन्हेगार त्याच तोऱ्यात वागत असतात. गुन्हा करणाऱ्याला भीतीच राहिली नाही . " सांगितले तरी नायकीती बटकीचे । पुढे शिंदळीचे रडतील ।।" असा शाप सुद्धा महाराजांनी दिलेला आहे. संस्काराने माणूस घडत असतो . धर्म माना  नका मनू हा भाग वेगळा पण परस्त्री मातेसमान मानायला काय हरकत आहे . "Brothers and sisters god is one "  हा संदेश स्वामी विवेकानंदानी अमेरिकन लोकांना शिकागो येथे दिला तेव्हा बंधू - भगिनी हा भाव त्यांना नवीन होता कारण त्यांना फक्त " Ladies and gentleman " एवढेच माहित होते.  दृष्टी बदलली कि जग सुंदर आहे आणि दृष्टी विकृत झाली कि जग हे नरक आहे . कीर्तनकार, प्रवचनकार, समाजसुधारक, नेते, पुढारी  हे सगळे उदबोधनात्मक बोलत असतात पण ! याचा परिणाम होत नाही . का ? त्याचे कारण म्हणजे " बोलते मगर करते नाही मुहसे भले लबाड ". वृत्तीसह कृती नाही " सर्वच कमर्शियल झाले आहेत त्यामुळे समाजाचा सुद्धा यांच्यावर विश्वास राहिला नाही . अध्यतमाच्या क्षेत्रात करोडो रुपयांची उलाढाल होत असते . पण सत्कारणी किती लागते हे ज्याचे  त्यालाच माहित . "सब पैसेके भाई आपणा कोई नाही " दहशतवाद्यास शाहिद म्हणण्याची प्रथा आपल्याकडे रुजवली जातेय . नथुराम गोडसेचे उद्दात्तीकरण केले जातंय हि कसली मानसिकता . स्वतंत्र्य लढ्यातील एक मोठा नेता बलात्कारी होता पण त्याचेही उदात्तीकरण झाले ...... एक खोटे दहा वेळा सांगितले कि ते खरे वाटू लागते . असो तरीसुद्धा लोकशाहीने आपणास विचार स्वतंत्र्य दिलेले आहे त्याचा उपयोग करून आपण आपल्या परीने आवाज उठवू अर्थात एवढया मोठ्या भाऊगर्दीत आपला आवाज विरून सुद्धा जाईल पण आपण प्रयत्न सोडायचे  नाही . " सदैव सैनिका पुढेही जायचे , न मागुती तुवा कधी फिरायचे ".

 भागवताचार्य  अशोकानंद महाराज कर्डीले